
कार्तिकी वारीत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा पर्यावरण रक्षणाचा संकल्प
पर्यावरण संवर्धन हा वारकरी परंपरेचा आत्मा, प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, वाढवणे आणि जपणे ही जबाबदारी स्वीकारावी- शिंदे यांचे आवाहन
पंढरपूरमध्ये कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप सोहळा संपन्न
पंढरपूर, ता, 1 : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी उपस्थित राहून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक वारीचे आवाहन करताना “विकासाचे वारकरी व्हा, विनाशाचे मारेकरी नका,” असा संदेश दिला. हवामान बदलामुळे राज्यात अनियमित पर्जन्यमान होत असल्याचे नमूद करत, मेपासून नोव्हेंबरपर्यंत पडलेला पाऊस ही निसर्गातील गंभीर असंतुलनाची लक्षणे असल्याचे ते म्हणाले. पर्यावरण संवर्धन हा वारकरी परंपरेचा आत्मा असून प्रत्येक नागरिकाने झाडे लावणे, वाढवणे आणि जपणे ही जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते.
वारीत लाखो वारकरी सहभागी होतात, त्यामुळे या वारीतूनच समाजाला निसर्ग रक्षणाचा संदेश द्यावा, असे आवाहन करत त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, नद्यांचे प्रदूषण निर्मूलन, जलसंधारण, बीच क्लिनिंग आणि डीप क्लिन ड्राईव्ह या उपक्रमांना गती देण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्यात १ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ग्रामीण व शहरी भागात अर्बन फॉरेस्ट मॉडेल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांपासून पर्यावरण शिक्षणाची कास धरणार असल्याचेही ते म्हणाले.
वारकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देताना शिंदे म्हणाले की, वारकऱ्यांसाठी विमा योजना आणि दिंडी अनुदान लागू करण्यात आले आहे. मंदिर परिसर विकासासाठी २५० कोटींचा निधी देण्यात आला असून भाविकांच्या सोईसाठी १३० कोटी रुपयांचा नवीन दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. वारीदरम्यान स्वच्छता, पाणी, रस्ते, मोबाईल टॉयलेट्स अशा सुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी अनियमित पावसामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलपर्यंत अहवाल आणि जूनपर्यंत निर्णय देण्याबाबतचे संकेत त्यांनी दिले. नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येणार असून जमीन वाहून गेल्यास प्रति हेक्टर ३.४७ लाख मदत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नदी स्वच्छतेसंदर्भात उल्हास, वालधुनी, इंद्रायणी यांसारख्या प्रमुख नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी योजना सुरू असल्याचे सांगून, राज्यातील किल्ल्यांची स्वच्छता मोहीम रायगडपासून सुरू करण्यात येत असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले. बांबू उद्योगाला प्रोत्साहन देत विमानतळापासून विविध ठिकाणी याचा वापर करण्याचे धोरण ठरवले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“वारकरी परंपरा निसर्गपूजेवर आधारित आहे. पांडुरंगाच्या दारी आलो आहोत, तर आज आपण सर्वांनी निसर्ग संवर्धनाचा संकल्प करूया,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी जनता आणि वारकऱ्यांना एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री तानाजी सावंत, आमदार अभिजीत पाटील, आमदार सिद्धेश कदम तसेच जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
…..









